कंबरदुखी
कंबरदुखीच्या निरनिराळ्या कारणांपैकी एक कारण म्हणजे कमरेच्या मणक्याची नैसर्गिक आकार बिघडणे. बऱ्याच वेळ चुकीच्या बसण्याच्या पद्धती मुळे, सतत पोक काढून बसल्याने कमरेच्या मणक्यातील ही नैसर्गिक आकार बिघडू शकते. काही वेळा गमंत म्हणून अंग वेगवेगळ्या कोनात फिरवणे, चुकीच्या पद्धतीत व्यायाम करणे, शरीराच्या कुवतीपेक्षा अंग जास्त प्रमाणात ताणणे, नेहमी चुकीच्या पद्धतीत उभे राहणे, इतकेच नाही तर चुकीच्या पद्धतीत झोपल्यानेही कंबरदुखीचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच आपल्या शरीराच्या हालचाली आणि शरीराचे नैसर्गिक पोश्चर बाबतीत सतत दक्ष असणे आवश्यक आहे.
कंबरदुखीने त्रस्त झालेल्या रुग्णांच्या रोजच्या शारीरिक हालचाली नैसर्गिकरित्या सुरळीत होत नाहीत. दैनंदिन कामात बाधा येते. काहींना काम करताना जास्त वेळ उभे राहणे त्रासदायक होते तर काहींना मांडी घालून व्यवस्थित बसता येत नाही. कोणत्याही कामासाठी उठं बसं करणे कठीण वाटू लागते. रोजची नियमित कामे देखील सोईने करता येत नाहीत. दिवसभराचा व्याप संपल्यावर थोडसं आडवं व्हाव वाटलं तर नक्की कोणत्या स्थितीत झोपवं तेच कळत नाही. पाठीवर झोपल्यास किंवा कुशीवर झोपल्यासही तितकासा आराम मिळत नाही.
कंबरदुखी ही एकच तक्रार असली तरी व्यक्तीनुरूप दुखण्याचा जोर कमी अधिक प्रमाणात असू शकतो. काहींच्या बाबतीत हे दुखणे सतत राहते तर काहींना दिवसभरातील ठराविक हालचालीमध्येच त्रास जाणवतो. काहींची दुखण्याची तीव्रता दिवसाभरात निरनिराळी असते. काही व्यक्तींना सतत कळा येतात तर काहींना ठसठसल्यासारख्या वेदना येत राहतात. विशेष म्हणजे प्रत्येक व्यक्ती नुरूप तक्रारींना आराम पडण्याऱ्या गोष्टी देखील वेगवेगळ्या असतात. काहींना दुखऱ्या भाग दाबून घेतल्यावर बरे वाटते तर एखाद्या व्यक्तीला दुखऱ्या भाग दाबल्याने वेदनेची तीव्रता वाढते. काहींना गरम पाण्याचा शेक घेतल्याने बरे वाटते तर काहीचे दुखणे शेकल्याने वाढते. प्रत्येक व्यक्तीसाठी या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात. म्हणूनच अशा वेळी व्यक्तीसापेक्षतेनुसार केले गेलेले उपचार फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर कंबरदुखीच्या त्रासामध्ये ठराविक तपासण्या करून घेणे अतिशय आवश्यक असते. तपासण्यांच्य आधारे मणक्यातील आणि खुब्यातील दोष समजतात. त्याचा सखोल आणि अचूक अभ्यास करून, मणक्यामध्ये आलेले दोष वेळीच कमी करण्यासाठी तसेच मणक्याचा आकार काही प्रमाणात पूर्ववत करण्यासाठी पोश्चर थेरपी द्वारे निश्चित उपचार करता येतात. एक मात्र नक्की, आजार किती जुनाट आहे या आणि इतर काही गोष्टीवर उपचारांची परिणामकारकता अवलंबून असते.
कंबरदुखी ही शारीरिक व्याधी काही अंशी मानसिकतेवर देखील अवलंबून असते. त्यावर नंतर बोलू. या सर्व बाबी जाणून घेतल्यानंतर वरील प्रकारचा कंबरदुखीचा त्रास भविष्यात होऊच नये यासाठी कोणती आवश्यक खबरदारी घ्यावी याविषयी जाणून घेऊया.
१ अवजड वस्तू एकाच हाताने न उचलता दोन भागात विभागून घेऊन दोन्ही हाताने उचलाव्यात.
२ जमिनीवर खाली पडलेली वस्तू उचलण्याकरीता फक्त कमरेतून न वाकता थोडेसे गुडघ्यामध्ये वाकून मगच उचलावी.
३ खूप वेळ एकाच जागी उभे राहून किंवा बसून काम करायचे असल्यास किमान प्रत्येक एका तासाने उठून थोडीतरी शारीरिक हालचाल करून मगच पुन्हा काम सुरू करावे.
४. बसताना पाठीच्या कण्याला पूर्ण आधार मिळेल अशी दक्षता घेण्याची सोय असावी.
५. पायामध्ये योग्य प्रकारची पादत्राणे वापरावीत.
६. नियमित आणि योग्य असा आहार असावा.
७. शरीराच्या प्रकृती नुसार तज्ञांच्या मार्गदर्शना खाली योग्य प्रकारचे व्यायाम करावेत.